देहू ( Dehu) हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेल्या या गावाचा इतिहास मार्मिक आणि परिचित आहे.कारण हे गाव महाराष्ट्रातील जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव आहे. त्यामुळे हे एक प्रख्यात तिर्थक्षेत्र आहे. येथेच संसारी असलेल्या संत तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे प्रमुख दैवत आणि वारकऱ्यांचे कैवारी असलेल्या विठ्ठलाची मनोभावे भक्ती करून वैकुंठाला गेले.
तुकाराम महाराजांप्रमाणेच त्यांचे वंशज विश्वंभरबाबांनी सुद्धा वैकुंठगमन केले असे म्हणतात. संत तुकाराम महाराजांचा जन्म इ.स. 1608 मध्ये देहू गावात झाला होता. त्यांचे वडील बोल्होबा बाबा आणि आई कंनकाबाई, पहिली पत्नी रखुमाई आणि दुसरी पत्नी जिजाबाई. आपत्ये महादेव,विठोबा, नारायण,आणि भागुबाई असा त्यांचा परिवार होता. सुरुवातीला तुकाराम महाराजांचा सावकारीचा व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता जमिनीचे गहाण कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून त्यांनी सर्वांना कर्जातून मुक्ती दिली. आणि पांडुरंगाच्या भक्तीत विलीन झाले.
अनेक भाविक देहूला आल्यानंतर जवळील पर्यटनस्थळी फिरण्यासाठी जातात तसेच धार्मिक स्थळी दर्शनासाठी जातात. पुणे जिल्ह्यात लोणावळा खंडाळ्यासह लालमहाल,सारसबाग, खडकवासला धरण,शनिवार वाडा, सिंहगड, शिवनेरी किल्ला अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच आळंदीला संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर, रांजणगावला महागणपती मंदिर, पुण्यात चतुर्श्रुंगी मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, मानाचे कसबा गणपती मंदिर, भीमाशंकरला ज्योतिर्लिंग मंदिर इत्यादी धार्मिक स्थळेही आहेत.
महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविक देहूला दर्शनासाठी येत असतात. या देहुला येण्यासाठी भाविक सहज पोहचू शकतात. कारण हे गाव पुणे शहराजवळ असल्याने जवळूनच अनेक महामार्ग असून देहू गावापासून पश्चिमेला दहा- बारा किलोमीटर असलेल्या तळेगाव दाभाडे या गावात मोठे रेल्वे स्टेशन आहे. तसेच येथे येण्यासाठी जवळच पुणे शहरात पुणे एसटी बस स्टॅन्ड आहे. येथे महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातूनही एसटी बसेस येतात. जवळच चाकण एमआयडीसी असल्याने इतर वाहनेही या भागात अनेक ठिकाणाहून येतात.देहू गावात तुकाराम बीज दिवस म्हणजे संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमणाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
अनेक वारकरी दिंड्यामध्ये तर अनेक भाविक वेगवेगळ्या वहानांनी या यात्रेत्या येतात फाल्गुन वैद्य द्वितियेला तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमण झाले असे मानले जाते.या दिवशी ज्या ठिकाणाहून महाराज वैकुंठाला गेले तेथे एक नांदूरकीचा वृक्ष आहे या वृक्षाखालूनच संत नुकाराम महाराजांनी वैकुंठगमन केले असे म्हणतात.तुकाराम बीज दिवशी हे नांदुरकीचे झाड आपोआप हलते. ते पाहण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी गर्दी करतात.हे ठिकाण महाराजांच्या प्राचीन मंदिरापासून उत्तरेला काही अंतरावरच आहे.त्यावर त्यांनी आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असा एक अभंगही रचलेला आहे.
महाराजांच्या प्राचीन मंदिरापासून उत्तरेला काही अंतरावरच महाराजांचे गाथा मंदीर आहे. हे मंदिर अलीकडच्या काळातील असून फार प्रशस्त आहे. त्याचे बांधकाम पूर्णपणे संगमरवरी दगडापासून केले असून याच्या आतील बाजूस तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा संगमरवरी दगडावर कोरून लिहिलेली आहे. याच ठिकाणी इंद्रायणीच्या डोहात रामेश्वर भट्टांच्या सांगण्यावरून महाराजांच्या गाथा बुडवल्या होत्या. वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगीतल्यावरून त्यांना त्यांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली होती. यावेळी महाराजांनी तेरा दिवस येथेच एका शिळेवर बसून उपोषण केले व पांडुरंगाचे नामस्मरण केले. आणि महाराजांच्या या आत्मिक सामर्थ्यामुळे साक्षात पांडुरंगाच्या कृपेने तेरा दिवसानंतर त्या गाथा पाण्यावर तरंगू लागल्या.
म्हणून महाराजांनी ज्या शिळेवर बसून पाइरंगाचे स्मरण केले त्या शिळेची स्थापना या गाथा मंदिरात केलेली आहे तसेच महाराजांची एक बसलेली आकर्षक मूर्तीही मंदिरात आहे. या गाथा मंदिराच्या परिसरात भक्तांसाठी ज्ञानदिप भक्तनिवास, अन्नपूर्णा सदन, सहसत्संग भवन, गोशाळा, आणि गुरुकुल आहे. भक्तनिवासात भक्तांना राहण्यासाठी पाच व्यक्तीसाठी चारशे रुपये तर पंचवीस व्यक्तीमाठी अठराशे रुपये घेतले जातात. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी एक गादी, उशी, व ब्लॅंकेट दिले जाते. दुपारी बारा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत या पैशांमध्ये भाविक येथे राहू शकतात.या ठिकाणी मध्यपान, धुम्रपान व मांसाहार करण्यास मनाई आहे.आणि शातता व स्वच्छता ठेवण्यास बंधनकारक आहे.
गाथा मंदिरापासून चार-पाच किलोमीटर अंतरावरच भंडारा डोंगर आहे. याच डोंगरावर तुकाराम महाराजांनी गाथा लिहली असे मानतात.या डोंगरावर जाण्यासाठी एक नागमोडी वळनाचा पक्का रस्ताही करण्यात आलेला आहे. तसेच मोठे मंदीर बनवण्याचे कामही सुरु आहे. या डोंगराला भंडारा डोंगर म्हणण्याची सुद्धा एक आख्यायिका आहे ती म्हणजे एके दिवशी संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी देहूला छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तेव्हा लोकांनी तुकाराम महाराज येथे नसतात ते डोंगरावर असतात असे सांगीतले. त्यावेळेस शिवाजी महाराज. स्वतः त्या डोंगरावर गेले भाणि संत तुकाराम महाराजांचे त्यांनी दर्शन घेतले.
मग तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना येथून चार घास खाऊन जाण्याची विनंती केली. परंतु तेथे फक्त तुकाराम (Tukaram Maharaj) महाराजांच्या जेवनाचा डबा होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तेथे भक्तांसाठी व त्यांच्या सर्व मावळ्यांसाठी जेवनाची व्यवस्था केली. त्या जेवणालाच भंडारा म्हणतात. म्हणून त्या दिवसापासून त्या डोंगराला भंडारा डोंगर म्हणतात. या भंडारा डोंगराच्या बाजूलाच भामचंद्र डोंगर व घोराडेश्वर डोंगर आहे. या डोंगरावरही तुकाराम महाराजांचे वास्तव्य असायचे असे म्हणतात. म्हणून हे तीनही डोंगर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत असे म्हणतात.
भंडारा डोंगरा जवळच एक सुदूंबरे नावाचे गाव आहे. तेथे संत जगनाडे महाराजांचे मंदिर आहे. त्यांनीच संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे तुकाराम महाराजांच्या सांगण्यावरून लेखन केले असे म्हणतात. भंडारा डोंगरावर असलेल्या एका वृक्षाखाली बसून महाराजांनी सर्व अभंग रचले असे म्हणतात. म्हणून सर्व भाविक या वृक्षाला नमन केल्याशिवाय जात नाहीत.