संत बसवेश्वर | Sant Basaveshwar

आपल्या भारत देशाला महान संत, महात्मे आणि थोर समाज सुधारकांची परंपरा लाभलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने सकल मानव जातीला धम्माचा उपदेश देणारे भगवान बुद्ध, अहिंसेचा पुरस्कार करणारे भगवान वर्धमान महावीर, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,संत नामदेव महाराज,गुरु नानक देव, संत रविदास, संत कबीर आणि जगाला जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद झुगारून समता, बंधुत्व आणि विवेक स्वीकारून खरे परिश्रम हेच परमेश्वर असा महान संदेश देणारे 12 व्या शतकातील जगत ज्योती महात्मा संत बसवेश्वर ( Sant Basaveshwar ) होय. त्यांना महात्मा बसवेश्वर ,बसवण्णा ,बसव या नावानेही ओळखले जाते . त्या काळात धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांचे सर्व बाजूने शोषण केले जात होते .

जातिभेद लिंग भेद आणि वर्णभेद करत मनुष्य मनुष्याचा भेद करत होता. अशा भयान काळोखात क्रांतीचा सूर्य उगवला. महात्मा बसवेश्वर यांचा जन्म इ.स 1105 मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला , ज्या गावी त्यांचा जन्म झाला ते गाव सध्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिह्यात बागेवाडी हे आहे .त्यांची आई मादलांबा आणि वडील मदीराज उर्फ मादरस हे होते .त्या काळात अत्यंत बिकट परिस्थितीत धर्माच्या नावाखाली होणारे शोषण पाहून बसवेश्वर यांचे मन अतिशय व्यतीत होत होते.आपल्याच घरातील स्वतःला आणि बहिणीला मिळणारी वागणूक बघून तसेच आपल्यातीलच काही मुलांचा शूद्र म्हणून होणारा छळ पाहून बसवेश्वरांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत होते.

अशावेळी त्यांच्या प्रश्नांना मोठ्या लोकांनी दिलेली वेगवेगळी तर्कहीन उत्तरे बसवांना कधीच पटली नाहीत. वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा बसवांचा उपनयन संस्कार होत होता तेंव्हा त्यांनी हट्ट धरला होता की, माझा उपनयन संस्कार करण्या अगोदर माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या बहिणीचा म्हणजे अक्का नागाईचा अगोदर हा संस्कार करावा. उपस्थित असलेल्या पंडितांनी स्त्री शूद्र असल्यामुळे सदर संस्कार करण्याचा अधिकार स्त्रियांना नाही असे उत्तर देताच महात्मा बसवेश्वर म्हणाले जर स्त्री शूद्र असेल तर मी तिच्या पोटी जन्म घेणारा कसा उच्च असेल! असे म्हणून स्त्री – पुरुष भेद करणारा उपनयन संस्कार बसवेश्वर यांनी नाकारला.

पुढे आपल्या अशा क्रांतिकारी विचारांचा त्रास आपल्या आईवडिलांना होऊ नये म्हणून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग केला.त्याकाळी परिस्थिती अशी होती की जो कोणी कर्मकांडाच्या विरोधात आवाज उठवील त्याला देव धर्मांच्या नावाखाली अधिपत्य गाजवणारे समाजातून वाळीत टाकत असत. समाजाला अशा गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता महात्मा बसवेश्वर यांनी केलेला हा पहिला महान त्याग होता. गृहत्याग करून महात्मा बाल बसवेश्वर तत्कालीन शैव परंपरेचे प्रसिद्ध केंद्र असलेले कुडल संगम येथील ईशान्य मुनीच्या आश्रमात आले. तेथे त्यांनी विद्याभ्यास केला. धर्मशास्त्राचा अभ्यास करताना धर्मग्रंथात असलेले तत्वज्ञान आणि प्रचलित समाज व्यवस्था यामध्ये मोठी तफावत पाहून बसवेश्वरांचे चिंतन नव्या दिशेने सुरू झाले.

मंदिरात फक्त विशिष्ट लोकांनाच मिळणारा प्रवेश, देवाधर्माच्या नावाने होणार समाजाचे आर्थिक शोषण, अशा अनेक गोष्टी त्यांना नकोशा वाटू लागल्या. धर्म,पंथ, जात,वर्ण,वंश आणि लिंग अशा भेदांनी छिन्नविच्छिन्न झालेल्या समाजाला एकसंघ करण्याकरता समानतेचा प्रतीक असलेल्या इष्टलिंगाचा अविष्कार त्यांनी घडवून आणला. भेदनीती संपवून इष्टलिंग धारण करणारी प्रत्येक व्यक्ती लिंग बनते. आणि तोच आजचा लिंगायत धर्म होय. ईस्ट लिंगाबाबत महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात –
“ विशाल विश्वा पार, असीम गगना पार ll त्याही पार, तव विस्तारातील विस्तार ll श्री चरण तुमचे पाताळ पल्याड, श्री मुकुट तुमचा ब्रम्हांड पल्याड ll अगम्य अगोचर अप्रतिम लिंग प्रभू, कर्र स्तलावर माझ्या येऊन या विराजला ll लहान तुम्ही झालात ओ कुडल संगम देव ll”

बसवेश्वरांनी प्रत्येकाचा देव प्रत्येकाकडे दिला कारण मंदिरातील देवावर धनिकांची आणि पुजाऱ्यांची सत्ता होती. या देवाची पूजा करण्यास वेळेचे आणि कोणाचेही बंधन नसेल. कोणताही अवडंबर नाही व कोणताही भेदभाव नाही. कोणतेही सोहळे नाही व कोणतेही सुतक नाही. “सदन बांधती देवालय, देवा मी गरीब काय करू ll देहच माझे देवालय, देवळाचे खांब माझे पाय ll मस्तक माझे असे सुवर्णकलश, सावरपावे नाश ll चैतन्य असे अविनाश, पहा हो कुडल संगम देवा ll” याच दरम्यान बसवेश्वरांच्या मामांचे म्हणजे बिजवल राजाचे मंत्री असलेले बलदेव यांचे आगमन कुडल संगम ( Kudal sungam ) या ठिकाणी झाले होते.

पुढे बसवेश्वर यांचा विवाह, मंत्री बलदेव यांची कन्या गंगा बिका हिच्याशी होऊन ते मंगळवेढा येथील राजा बीजवालकडे कारकून काम करू लागले .कामातील तत्परता, नम्रता आणि प्रामाणिकपणा पाहून महात्मा बसवेश्वर राजा बिज्वलाकडे प्रधान पदापर्यंत मजल गाठतात. समाजाला अनिष्ट रूढी आणि परंपरा यातून मुक्त करण्याची इच्छा बसवेश्वरांना स्वस्त बसू देत नाही. बिजवल राजाची राजधानी कल्याणला आल्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी जगातील पहिली लोकशाहीचा पुरस्कार करणारी संसद प्रणाली म्हणजेच “अनुभव मंडप” ( Anubhav mandap ) स्थापन केला ,तेथे कोणताही भेदभाव न मानता प्रत्येकाला प्रवेश दिला गेला .

महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात -” हा कोणाचा, हा कोणाचा,हा कोणाचा असे म्हणू नका हो, हा आमचा, हा आमचा, हा आमचा असेच म्हणा हो l कुडल संगम देवाच्या घरचापुत्र असती, असेच बघा हो ll”
अनुभव मंडपात प्रत्येक व्यक्ती आपापले कार्य करून म्हणजेच रोजचे काम करून धर्माबाबत चर्चा करत असत. बसवेश्वर प्रभूच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या अनुभव मंडपात एकूण 770 सभासद होते. त्यापैकी 70 सभासद महिला होत्या. या अनुभव मंडपाचे काम आजच्या लोकशाहीतील संसद कार्य प्रणाली प्रमाणे चालत होते. त्या सर्व सभासदांना समान अधिकार आणि स्वतःचे मत मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. महात्मा बसवेश्वरांनी आणि सर्व सभासदांनी अनुभवालाच प्रमाण मानले होते.

अनुभव मंडपात माणसाने कसे वागले पाहिजे यावर साधक बाधक चर्चा करून विचार पारित केले जात होते आणि ते त्याकाळच्या कन्नड भाषेत लिहिले जात होते. हे वचन साहित्य म्हणजे समाजाला दिला जाणारा कोरडा उपदेश नसून आचरणात आणून सांगितलेला अनुभव आहे. महात्मा बसवेश्वर यांनी भिक्षा वृत्तीला विरोध केला होता. व्यक्ती कोणीही असो मग तो संन्याशी किंवा संसारी असला तरी त्याने सन्मार्गाने आणि परिश्रमाने आपले पोट भरले पाहिजे . कार्य एकच खरा कैलास आहे आणि परिश्रमच खरा परमेश्वर आहे आणि आपले काम हीच खरी ईश्वर पूजा आहे. म्हणून आपले काम सत्यतेने आणि पूर्ण निष्ठेने करावे असा महान संदेश महात्मा बसवेश्वरांनी दिला. त्याचप्रमाणे सर्वांकडे समानतेने बघण्याची दृष्टी संत महात्मा बसवेश्वरांनी दिली.

संत महात्मा बसवेश्वरांचे हे मानवतावादी कार्य पाहून अनेक ठिकाणाहून आणि विविध प्रांतातून अनेक लोक त्यांच्या या कार्यात सामील झाले होते. त्यात प्रामुख्याने सोलापूरचे सिद्ध रामेश्वर, मडिवाळ माचय्या, अक्का महादेवी, महाराष्ट्राचे ऊरीलिंग देव, बहुरूपी चौडय्या, चरण आरय्या,काश्मीर चा राजा महादेव, अफगाणिस्तानचे मंगळूर शंकर देव, विदर्भाचे ढोर तकय्या, त्याचबरोबर श्रमाला सर्वश्रेष्ठ मारणारे मुरुड तकय्या अशा महान थोर लोकांची साथ संत महात्मा बसवेश्वरांना लाभली.

या सर्व शरणांच्या मदतीने महात्मा बसवेश्वरांनी जीवन जगण्याचा नवा मार्ग दिला. यामध्ये प्रामुख्याने देवा धर्माच्या नावाने चालणाऱ्या सर्व वाईट चाली रीतींना, कर्मकांडाला, महिला पुरुषातील लिंगभेदाला नाकारून समाज प्रणाली बनवली. विधवांचे पुनर्वसन,महिलांना सर्व अधिकार, वैशांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याकरिता स्वर्ग,नर्क अशा भ्रमक कल्पनांना विरोध केला. शूद्र,अतिशूद्र यांना जाणून घेण्यासाठी संत महात्मा बसवेश्वर म्हणतात- “आकाश एकच, वेशी बाहेर आणि वेशीच्या आतल्यांसाठी l जमीन एकच शूद्र आणि शिवालयांसाठी l पाणी एकच सौच्च आणि आचमनासाठी l कुळ एकच स्वतःला जाणून घेण्यासाठी, सर्व असती एकच तुम्हाला जाणून घेण्यासाठी l पहा हो कुडल संगम देवा ll”

संत महात्मा बसवेश्वर फक्त बोलणारे नाही तर कृतीतून करणारे होते. “बोले तैसा चाले,त्याची वंदावी पावलेll” असे त्यांचे आचरण होते. या दरम्यान त्यांनी जातीभेदाच्या भिंती तोडण्याकरिता ब्राह्मण माधुरस यांची कन्या कलावती व चांभार हरवय्या यांचा पुत्र शीलवंत यांचा विवाह अनुभव मंडपाच्या मार्गदर्शनाने आणि संमतीने लावण्यात आला होता. जातिभेदाला संपवण्याकरिता त्यांनी उचललेले हे पाऊल त्याकाळी महान क्रांतिकारी पाऊल होते. त्यांच्या अशा क्रांतिकारी विचाराने सर्व समाज ढवळून निघाला होता.

त्याकाळी सनातनी कर्मठ लोकांच्या पचनी ही गोष्ट पडली नाही. त्यांनी राजा बीज्वलाचे कान भरणी सुरू केले होते. त्यामुळे धर्म बुडाला,धर्म बुडाला असा टाहो फोडत मधुरस हरळय्या यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यास भाग पाडले होते. संत महात्मा बसवेश्वरांनी या विरोधात आपल्या प्रधानपदाचा त्याग केला. अशातच राज्यात अराजकता पसरली. यामध्ये राजा बीज्वलाचा खून झाला. त्यामुळे महात्मा बसवेश्वरांना अति दुःख झाले. मुळातच त्यांना हिंसा नको होती. त्यामुळे त्यांना कल्याण सोडावे लागले. शरणांची अशी झालेली वाताहत पाहून त्यांचे मन व्याकूळ झाले होते. त्यावेळेस शरणांच्या कत्तली होऊ लागल्या होत्या.

संत महात्मा बसवेश्वर पुढे कुडल संगम येथे आले. अशा या भयान परिस्थितीमध्ये सण 1167 मध्ये नागपंचमी या दिवशी संत महात्मा बसवेश्वर अनंतात विलीन झाले. मानवतेचा सूर्य अस्त झाला. परंतु आपल्या विचाराच्या प्रकाशाने त्यांनी सारे जग उजळून टाकले.

Leave a Comment