महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण (Paithan) हे तालुक्याचे ठिकाण असून दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर हे शहर वसलेले आहे. प्राचीन काळापासून दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या या शहराचे पूर्वीचे नाव “प्रतिष्ठान“असे होते आणि ही पूर्वी सातवाहन राजाची राजधानी होती तर ब्रिटिश काळात हे शहर हैदराबाद संस्थानात मोडत होते. तसेच पैठण हे संस्कृत भाषेचे व्यासपीठ होते.
त्या काळापासून ते आत्तापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा निर्णय मानला जातो. सोळाव्या शतकातील शांतीब्रह्म, संत पदाला पोहोचलेले, उच्च कोटी समाज सुधारक,संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची जन्म आणि कर्मभूमी असलेल्या पैठण या गावी आणि जवळच असलेल्या शेवगाव तालुक्यातील मुंगी पैठण या गावी अनेक संत महापुरुष, महान पंडित,राजे महाराजे, आणि जहागीरदार होऊन गेले.
जसे की महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. निम्बार्क सांप्रदायाचे संस्थापक श्री निम्बार्क यांचे पैठण हे जन्मस्थान आहे. पैठण प्रसिद्ध प्राचीन दिगंबर जैन अतिशय क्षेत्र( चमत्काराचे तीर्थस्थान ) आहे. तसेच पैठणी साडीसाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. तसेच शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे सख्खे बंधू विठोजीराजे भोसले हे मुंगी पैठण येथे राहत होते.एवढेच नाही तर संत भानुदास, संत गावबा, कृष्ण दयार्णव महाराज, शंकरराव चव्हाण ( महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री), भैय्यासाहेब महाराज गोसावी ( नाथ वंशज ) बाळासाहेब पाटील( इतिहास संशोधक), कवी अमृतराय महाराज, कमलाकरराव वातोळे ( पेशव्यांचे राहूकार आबाजी नाईक यांचे वंशज ) योगीराज महाराज गोसावी ( नाथ वंशज ) अशा महान व्यक्तींचे वास्तव्य या पैठण शहरात होत
संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या येथील समाधीमुळे हे गाव पुढे फारच नावारूपास आले. पैठण येथे राहूनच नाथांनी अपार विठ्ठल भक्ती केली. तसेच त्यांच्या 64 वर्षांच्या आयुष्यात अनेक अभंग, ग्रंथ, पुस्तके, कविता, भारुडे आणि गवळणी सुद्धा लिहिल्या. त्यांचे अपूर्ण लिखाण हे त्यांचे एकनिष्ठ शिष्य गावबा महाराज यांनी केले. त्यांच्या या लिखाणातून आणि कीर्तनातून समाजास त्यांनी अनेक वर्ष प्रबोधन केले. संत एकनाथ महाराजांनी पहिला ग्रंथ “चतुर्रर्श्लोकी भागवत “ हा त्यांचे गुरु श्री जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेने नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पूर्ण केला.
त्यानंतर त्यांच्या एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, एकनाथी अभंग गाथा, चिरंजीव पद, रुक्मिणी स्वयंवर, शूकाष्टक टीका, स्वात्मबोध, आनंद लहरी अशा अनेक ग्रंथ आणि कादंबरिंचे लिखाण त्यांनी केले.त्याचे वाचन आजही अनेक भक्तगण करत असतात. एवढेच नव्हे तर संत एकनाथ महाराजांनी जवळजवळ 75 हजार कवितांचे लेखन केलेले आहे.आपल्याला त्यांचे पंजोबा भानुदास महाराजांच्या साहित्यात देखील एकनाथ महाराजांसारखेच अभंगांपासून ते गवळणी पर्यंत सर्व प्रकारचे लिखाण पहावयास मिळते. तसेच त्यांच्यामुळेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पार्श्वभूमी तयार झाल्याचे सांगितले जाते.
तसेच ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणालाच सापडत नव्हती त्या समाधीचा शोध एकनाथ महाराजांनीच लावल्याचे सांगितले जाते. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा जन्म इ.स.1533 मध्ये पैठण येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी होते. परंतु आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. एकनाथ महाराज लहान असताना त्यांचे आई-वडील अनंतात विलीन झाले. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळेच त्यांचे आई-वडील लवकरच मरण पावले अशी खंत नाथांच्या मनात कायम असायची आणि तसे त्यांनी लिहूनही ठेवले आहे.
आई-वडिलांनंतर त्यांचे पालन पोषण त्यांच्या आजोबांनी म्हणजेच भानुदास महाराजांनी केले. पुढे त्यांनी देवगिरीच्या जनार्दन स्वामींना गुरु मानले. गुरु जनार्दन स्वामींचा जन्म 1479 मध्ये चाळीसगाव येथे झाला होता. देवगिरीच्या किल्ल्याचे ते किल्लेदार होते तसेच महान दत्तभक्तही होते. त्यांचेही एकूण 33 अभंग आपणास पहावयास मिळतात नंतर त्यांनी पैठण जवळील वैजापूरच्या गिरीजाबाईशी लग्न केले. त्यांना गोदा आणि लीला नावाच्या दोन मुली आणि हरी पंडित नावाचा एक मुलगा होता. पुढे मुलगा हरीपंडित यांनी नाथांचे शिष्यत्व पत्करले. इ.स.सन 1599 मध्ये फाल्गुन वैद्य षष्ठीला संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्यावर हरी पंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पैठणला संत एकनाथ महाराज ज्या वाड्यात राहत होते त्या वाड्याचे रूपांतर मंदिरात करण्यात आले.
त्यांच्या या समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक भावीक दर एकादशीला पायी वारी करतात तसेच फाल्गुन वैद्य षष्ठीला म्हणजेच नाथ षष्ठीला पैठणच्या यात्रेला महाराष्ट्रसह अनेक प्रांतातून भाविक दर्शनासाठी येतात. यावेळेस येथे सहा दिवसांसाठी मोठी यात्रा भरते. मंदिराच्या गाभाऱ्यात संत एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवलेला आहे.येथील या समाधी मंदिराला आत ले नाथ मंदिर म्हणतात.आणि गावाबाहेरील गोदावरी नदीच्या काठाला असलेल्या मंदिराला बाहेरचे नाथ मंदिर असे म्हणतात संत एकनाथ महाराजांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की, साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने कावडीने पाणी नाथांच्या घरी आणत.
तो पाण्याचा हौद अजूनही या वाड्यात आहे. तसेच गोदावरीच्या काठावर नागघाट नावाचे ठिकाण आहे. येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वाधवले होते. येथे एक रेड्याची मूर्तीही आहे. पैठण हे प्राचीन काळापासूनच अनेक संत महापुरुषांचे अध्यात्मिक ठिकाण असल्यामुळे येथे संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरासह अनेक देवांची मंदिरे आहेत. त्यामुळे येथे आलेले भाविक अगदी जवळच असलेल्या दत्त मंदिर, नाथ घाट, श्री ढोलेश्वर महादेव मंदिर, मोठी वारकरी संस्था असलेले गीता मंदिर, गाढेश्वर महादेव मंदिर, गंगेश्वर व गिरीजा माता मंदिर, जैन मंदिर, एकनाथ महाराज पालखी स्थळ, सातवाहन राजाने विजय मिळवल्यानंतर उभारलेला विजयस्तंभ ( तीर्थ खांब ), इंद्रेश्वर महादेव मंदिर, नवनाथ गुफा मंदिर, सिद्धेश्वर महादेव मंदिर, आनंद भुवन (श्रीकृष्ण मंदिर ) आणि औरंगाबाद शहराच्या आजूबाजूला असलेल्या अनेक तीर्थक्षेत्रांना जातात.
तसेच काही भाविक पैठण आणि औरंगाबाद शहराजवळ असलेल्या प्रख्यात पर्यटन स्थळानाही भेट देतात.जसे की पैठण मध्येच असलेले पैठणी साडी केंद्र म्हणजे पैठणी साडी ( Paithani Sadi ) तयार करणारा कारखाना, तसेच प्राचीन प्रतिष्ठान नगरीतील भव्य दिव्य बांधकाम असलेले जुने वाडे,पैठण पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले आशिया खंडातील सर्वात मोठे आणि मातीचे धरण “ जायकवाडी धरण”, सातमाळा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेली ऐतिहासिक वास्तू म्हणजेच “सोनेरी महल “. पैठण पासून जवळच औरंगाबाद शहर आहे .
औरंगाबाद शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेले प्रख्यात “डॉ.सलीम अली सरोवर “, दोन किलोमीटर अंतरावर असलेला “बीबी का मकबरा “ पाच किलोमीटर अंतरावर असलेले “सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय” , चार किलोमीटर अंतरावर असलेले “छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय “ औरंगाबाद पासून 39 किलोमीटर अंतरावर असलेले 1667 मीटर उंचीचे थंड हवेचे ठिकाण” म्हैसमाळ “ साठ किलोमीटर अंतरावर असलेले प्रख्यात “ गौताळा अभयारण्य “ वाघुर नदीच्या आसपास असलेल्या आणि औरंगाबाद पासून 30 किलोमीटर असलेल्या अजंठा वेरूळच्या बौद्ध लेण्या, तसेच भारतातील सर्वात जुन्या पितळखोऱ्यातील लेण्या. भाविक अशा अनेक पर्यटन स्थळांनाही भेट देतात.

अशा या पैठण ठिकाणी जाण्यासाठी महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातूनही अनेक सुविधा उपलब्ध आहेत. पैठण औरंगाबाद रेल्वे स्टेशन पासून 48 किलोमीटर आणि औरंगाबाद विमानतळापासून 58 किलोमीटर आहे तसेच रेल्वे स्टेशन पासून आणि विमानतळापासून पैठणला जाण्यासाठी अनेक वाहने उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे औरंगाबाद एसटी बस स्टँड पासून पैठणला जाण्यासाठी एसटी बसेस ही उपलब्ध आहेत एवढेच नव्हे तर अनेक जिल्ह्यांमधून औरंगाबादला तसेच डायरेक्ट पैठणला जाण्यासाठीसुद्धा एसटी बसेस उपलब्ध असतात. तसेच पैठणला भक्तांना मुक्कामी राहण्यासाठी माहेश्वरी भक्त निवास आहे.
या ठिकाणी दोन बेडच्या स्वच्छ आणि प्रशस्त रूम्स आहेत. अगदी अल्प दरात भक्तांना राहण्यासाठी येथे सोय आहे. येथे भक्तांना सकाळी 8:00 ते 10:00 लास्ट ची सोय केली जाते, दुपारी 12:00 ते 2:00 वाजेपर्यंत दुपारचे जेवण मिळते तसेच रात्री 8:00 ते 10:00 वाजेपर्यंत रात्रीचे जेवण मिळते येथे रूम बुक करण्यासाठी yatraDham.org या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाइन बुकिंग सुद्धा करू शकतो.त्याचप्रमाणे पैठणला बरेच प्रायव्हेट लॉज सुद्धा आहेत तेथेही भक्तांची चांगली सोय केली जाते. तसेच काही भक्त जवळच असलेल्या औरंगाबाद येथील चांगली व्यवस्था असलेल्या भक्त निवासात किंवा प्रायव्हेट लॉजवर मुक्कामी राहतात.
मुंगी पैठण – Mungi Paithan
हजारो वर्षाचा ऐतिहासिक वारसा असणारे गाव मुंगी पैठण हे पैठण या ऐतिहासिक शहरापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. मुंगी या गावाचा फार प्राचीन इतिहास आहे. पूर्वीच्या काळी या गावाला पैठण या शहरासारखेच महत्त्व होते. शेवगाव तालुक्यात असणाऱ्या या गावात मुंगादेवी ही ग्रामदेवता आहे. येथे दरवर्षी या देवीची यात्रा भरते. यात्रेला कोकणातूनही अनेक भाविक येतात. प्राचीन काळी या गावाला पीपिलिका असे म्हणायचे. कारण या ठिकाणी दधीची ऋषी यांचा मुलगा पिप्यलाद याने येथे पीपीलिकेश्वर महादेवाची स्थापना केली होती. त्यानंतर या गावाला पीपीलिकेश्वर नाव पडले. यासंबंधीचा उल्लेख काशीखंड कथासार या ग्रंथांमध्ये केलेला आढळून येतो. पैठण या शहरापासून हे गाव जवळच असल्यामुळे या गावाचा उल्लेख मुंगी पैठण असा केला जातो.
हे मुंगी पैठण गाव अनेक संत, महापुरुष, आणि विद्वान यांचे जन्मगाव आहे. येथे 1863 मध्ये संशोधकांना अश्मयुगीन मानवाने बनवलेले अनेक दगडी हत्यारे सापडली. त्याचबरोबर जवळच असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रातही काही प्राचीन अवशेषही सापडले. त्यावरून हे गाव अश्मयुगातदेखील मानवी वस्तीचे केंद्र होते असे मानले जाते. आणि तसे अनेक पुरावे संशोधकांना मिळालेले आहेत. महाराष्ट्राच्या अश्मयुगीन लेखनाला सुरुवात याच गावात सापडलेल्या पुराव्यांनी झालेली आहे असे म्हणतात. निंबार्क समाजाचे प्रवर्तक श्री निंम्बार्क महाराज यांचा जन्म याच ठिकाणी झालेला असून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे सख्खे बंधू विठोजीराजे भोसले यांच्याकडे काही काळ मुंगी गावाची जहागिरी होती.
तसेच पहिले बाजीराव पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात पालखेड येथे लढाई झाली होती. या लढाईत पराभूत झालेल्या निजामाने या गावातच तह स्वीकारला होता. तो तह मुंगी – शेवगाव तह म्हणून ओळखला जातो. तसेच मुंगी या गावात विणकर लोकांची फार मोठी वस्ती होती. हे विनकर लोक पैठणी साडी विणण्याचे काम करायचे. तसेच पैठणीला लागणारा कच्चा माल मुंगी गावातूनच पुरवला जायचा. अशा या ऐतिहासिक गावाला भेट देण्यासाठी सुद्धा पैठणला आलेले भाविक जातात.