श्री क्षेत्र कुरवपूर ( Shree Kshetra Kuruvapur) म्हणजेच कुरगड्डी हे कृष्णा नदीने वेढलेले एक बेटअसून कलयुगातील दत्त प्रभूंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या तपश्चर्याने ते एक तीर्थक्षेत्र बनले आहे.येथे कृष्णामाईचे दर्शन,टेंबे स्वामींची गुहा आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचे पादुका दर्शन हे मुख्य आकर्षण असते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांचा पहिला अवतार श्रीपाद वल्लभ हाअसून पिठापुरम या गावी इसवी सन १३२० मध्ये झाला होता. हे गाव सध्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर आहे.
त्यानंतर त्यांनीशेवटच्या काळात कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी असलेले कुरवपूर येथे येऊन अनुष्ठान मांडले व महान तपश्चर्या केली. त्यामुळे कुरवपुरला त्यांची तपोभूमी असे म्हणतात. त्यांनी आपल्या अवतार कार्यातील शेवटच्या चौदा वर्षांचा काळ या परिसरात व्यतीत केला होता. अतिशय पवित्र आणि पावन अशा कुरवपूर भूमीवर महाराजांच्या कार्याची गुरुचरित्र मध्ये आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये या क्षेत्राविषयीचे अनेक उल्लेख आपणाला आढळतात. संपूर्ण देश विदेशातील दत्त संप्रदायाच्या आणि स्वामी संप्रदायाच्या सर्व भाविक भक्तांचे अत्यंत श्रद्धेच आणि कृष्णा मातेच्या अत्यंत विशाल पात्रामध्ये एखाद्या बेटाप्रमाणे कुरवपूरचे हे दत्त मंदिर वसलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कुरवपूर हे निजाम राज्यामध्ये होते.
आता ते कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यात येते. कृष्णा नदी या कुरवपूर खेड्याजवळ दोन भागात विभागते आणि पुढे ती परत एकत्र येते. त्यामुळे कुरवपूर हे एखाद्या बेटा प्रमाणे नदीच्या विळख्यात आहे. म्हणून कुरवपूरला कुरगुड्डी बेट असे म्हटले जायचे. येथेच एका दगडाच्या गुहेत बसून श्रीपाद श्रीवल्लभ महाराज तपचर्या करायचे व समोरच असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली अनुष्ठान करायचे. तसेच बेटावरील चार घरी माधुकरी मागून उदरनिर्वाह करीत असायचे. सकाळी उठून कृष्णा नदीवर अंघोळ करून हे ज्या दगडी शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार करत होते .तेथे त्या शिळेवर पडणारी त्यांची सावली आणि त्याच्या पायाच्या खुणा आजही स्पष्ट दिसतात. त्यावरून महाराजांच्या साधनेतील आणि तपश्चर्ये मधील ताकत स्पष्ट जाणवते. कृष्णा नदीच्या अलीकडच्या तीरावरून दत्त मंदिराकडच्या तीरावर जाताना बांबू पासून बनवलेल्या बोटींचा आधार आपल्याला घ्यावा लागतो.
कृष्णा मातेच्या प्रवाही पात्रात या बोटीतून दत्तप्रभूंचा नाम घोष करत जाताना एका आगळ्यावेगळ्या आनंदाची अनुभूती आपल्याला येते. दत्त मंदिरात प्रवेश करण्याआधी आपण भव्य अशा प्रवेशद्वारातून जातो . येथील दत्त मंदिराभोवती अत्यंत प्रशस्त असा प्रदक्षिणा मार्ग आहे. याच परिसरामध्ये औदुंबर आणि अस्वस्त वृक्ष आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताना पुरुषांना सोवळे नेसून प्रवेश करावा लागतो. त्यासाठी या ठिकाणी सोवळे उपलब्ध करून दिलेली आहेत. ही स्वामींची तपोभूमी असून तेथे स्वामींनी या रमणीय ठिकाणी अनुष्ठान केले,ध्यान केले आणि तप केले. म्हणून या भूमीला स्वामींची तपोभूमी असे म्हणतात.येथील स्वामी बसलेली जागा निर्गुणाकार पीठ स्वरूप आहे. श्री क्षेत्र कुरवपूर म्हटले तर त्यांची कर्मभूमी नसून ती तपोभूमी समजली जाते.
या जागेवर दररोज पूजा पाठ ,अभिषेक,महाआरती होत असते.त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे शृंगार दर्शन होते. तसेच येथे एक उत्सव मूर्ती आहे. हे दत्त मंदिर संपूर्ण दगडी बांधकामाचे असून अत्यंत मजबूत आणि प्राचीन स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना असे हे मंदिर आहे. मंदिरापासून जवळच एक टेंबे स्वामींची गुहा आहे. या गुहेमध्ये पूर्वी फार मोठा नागराज राहत असे. वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी महाराजांनी आदेश दिल्यानंतर नागराज तेथून निघून गेले. महाराज टेंबे स्वामींनी सुद्धा या ठिकाणी कठीण तपचर्या केलेली आहे. त्यांच्यानंतर श्रीधर स्वामी सारख्या अनेक साधू, सतपुरुष आणि संत महात्म्यांनी या गुहेमध्ये साधना आणि तपश्चर्या केलेली आहे. अत्यंत निर्गुण शांतता असलेल्या आणि साधनेने आणि तापचर्येने प्रसन्न झालेल्या या गुहेमध्ये प्रत्येक भक्ताने येथील दैवी शक्तीचा आणि ऊर्जेचा अनुभव आणि आशीर्वाद घ्यायला पाहिजे. या गुहेमध्ये जाताना अत्यंत वाकून किंवा गुडघ्यावर चालत जावे लागते. मंदिरापासून गुहेकडे जाण्याच्या मार्गावर एक अत्यंत प्राचीन आणि भव्य असा वटवृक्ष आहे.
चोहो बाजूने या वटवृक्षाच्या पारंब्या पसरलेल्या आहेत. वटवृक्षाच्या भोवती मोठा पार बांधलेला असून त्याच्या जवळच एका छोट्याशा मंदिरामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अत्यंत मनोहर मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. असे सांगितले जाते की साक्षात महाराजांनी येथे टेंबे स्वामी महाराजांना बोलवून घेतले होते. येथेही महाराजांनी कठोर तपश्चर्या केलेली असून पूर्ण चातुर्मास वास्तव्य करून तपसाधना करून येथील भूमी प्रसन्न केली होती. म्हणून दत्तप्रभूंचे हे स्थान अक्षय मानले जाते. मानवाच्या कर्मानुसार आणि दत्तप्रभूंच्या इच्छे नुसारच कुरपूरला जाणे होते असे जाणकारांचे मत आहे .स्वतःच्या मनाने किंवा स्व:इच्छेने येथे जाणे होत नाही.
येथे दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी गुरुद्वादशी दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो.या दिवशी कुरवपूरला जाऊन प्रभुंना केलेली प्रार्थना फळास लागते आणि भक्ताला जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते. तसेच टेंबे स्वामींनी कुरवपूर मध्ये असताना घोरकष्टोधारण या मंत्राची रचना केली होती. या मंत्राचा जप केल्याने भाविकांची आणि संकटातून मुक्तता होते अशी श्रद्धा आहे तसेच हा मंत्रोच्चार दररोज नित्यनेमाने करून त्याचे पठण केल्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही व आपली एखादी वस्तू हरवली असल्यास ती आपणास परत मिळते. अशी भक्तांची धारणा आहे. त्याचप्रमाणे भिजवलेली डाळ आणि गुळ येथील वटवृक्षाला प्रसाद म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे. असे केल्याने कष्टमुक्ती होते व चांगले आरोग्य लाभते. विशेष करून पौर्णिमेच्या वेळी कुरवपूर मधील वातावरण अतिशय भक्तिमय आणि शांत असते. कुरवपूर ला जाण्यासाठी रायचूर ला जावे लागते.
रायचूर हे शहर रेल्वे आणि चांगल्या रस्त्याने जोडलेले शहर आहे. महाराष्ट्रातून आपण रेल्वेने रायपूरला जाऊ शकतो आणि तेथून पुढे जवळच असलेल्या कुरवपूरला खाजगी वाहन किंवा बसने जाता येते .कुरवपूर मध्ये आलेल्या भाविकांसाठी राहण्यासाठी सोय म्हणून आश्रमाच्या अनेक रूम्स उपलब्ध आहेत त्यामध्ये जेवण व नाश्त्याची सोय आहे . येथील परिसर फार शांत असून कृष्णा नदीच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. कुरवपुर मध्ये गरिबांचे कष्ट दूर व्हावेत व भारत शांततेत नांदावा यासाठी 24 तास “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”जप चालू असतो. कुरवपुरला श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दर्शनासाठी जाणारे अनेक भाविक श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्म ठिकाणी म्हणजे पिठापुरमला, भगवान शिव शंकरांचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असलेल्या श्रीशैल्यम या ठिकाणी तसेच रायचूर पासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वामी राघवेंद्र मंदिर येथे दर्शनासाठी जातात.
एकूणच कुरवपुरला जाणाऱ्या भक्ताचा प्रवास भक्तिमय आणि ऊर्जामय ठरतो. त्याचप्रमाणे कुरवपूर मधील आश्रम, मंदिरे, कृष्णा नदीची भेट, निसर्गरम्य वातावरण, प्रख्यात वटवृक्षाच्या प्रदक्षिणा, टेंबे स्वामींची गुहा इत्यादी गोष्टी मनाला शांती देतात.
श्री क्षेत्र कुरवपूरच्या या इतिहासाविषयी वाचून खूपच प्रेरणा मिळाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या तपश्चर्येची कथा अतिशय प्रभावी आहे. कृष्णा नदीच्या काठी असलेल्या या पवित्र स्थळाचे वर्णन वाचून मन शांत झाले. अशा तपस्वी महापुरुषांच्या जीवनातून आपण खूप काही शिकू शकतो. कुरवपूरच्या दत्त मंदिराच्या महत्त्वाबद्दल वाचून तेथे भेट देण्याची इच्छा निर्माण झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पायांच्या खुणा आजही दिसतात हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. कृष्णा नदीच्या अलीकडच्या तीरावरून बोटीने जाण्याचा अनुभव कसा असतो?