तीर्थक्षेत्र भीमाशंकर |Tirthkshetra Bhimashankar

भारत देशामध्ये भगवान श्री शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे आहेत. शिवपुराणानुसार आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी, त्यांना तारण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले शिवरूप धारण केल्यामुळे या बारा ज्योतिर्लिंगांची निर्मिती झाली. त्यापैकी भीमाशंकर ( TirthKshetra Bhimashankar ) हे एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत रांगेत पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर तालुक्यात आहे.

मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र आहे. तसेच पुण्यापासून 123 किलोमीटर आणि राजगुरूनगर पासून 67 कि.मी आहे या ज्योतिर्लिंगाला मुटेश्वर महादेव असेही म्हणतात. उंच पर्वतावर तयार झालेले हे ज्योतिर्लिंग कसे तयार झाले आणि त्याला भीमाशंकर का म्हणतात याची एक कथा आहे. या कथेला रामायणाचा पुरावा दिला जातो. कथेनुसार रावणाचा भाऊ कुंभकर्ण आणि कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम असे होते. भिमाच्या आईचे नाव कर्कटी असे होते.

भीम त्याच्या आईबरोबर त्या उंच पर्वतावर राहत होता. पर्वताच्या आजूबाजूला राहणाऱ्या जनतेला तो खूप त्रास द्यायचा. एक दिवस भीम आपल्या आईला म्हणाला की,आई आपण दोघेच का बरं येथे राहतो. माझ्या वडिलांविषयी तू खरे काय ते मला सांग. त्यावेळी भिमाची माता कर्कटीने त्याला सांगितले की, अरे लंकेचा राजा रावणाचा भाऊ कुंभकर्ण हेच तुझे पिता आहे. ते फार महापराक्रमी होते परंतु एक दिवस त्यांनी प्रभू राम चंद्र यांची पत्नी सीताचे हरण करून तिला लंकेमध्ये घेऊन गेले.

त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणजे नारायणाचा अवतार ते या ठिकाणी आले आणि त्यांचे रावणाबरोबर महाभयंकर युद्ध चालू झाले. त्या अगोदर तुझे पिता कुंभकर्ण प्रभू रामचंद्र बरोबर लढाईला गेले होते. त्या महाभयंकर युद्धात प्रभू रामचंद्राने तुझ्या वडिलांना मारले. असे सगळे घडल्यानंतर मी तिथे एकटी काय करू म्हणून मी या उंच पर्वतावर तुझा सांभाळ करण्यासाठी आले. हे सर्व ऐकल्यानंतर हा भिमराक्षस अतिशय संतापला. तो म्हणाला आई तू बघच आता मी प्रभू रामचंद्रांचा हा जो अवतार आहे “श्री विष्णू “त्याला मी खूप त्रास देणार. त्यांना मी दाखवून देणार माझी ताकद. आमच्यासारख्या महाभयंकर राक्षसाचे सामर्थ्य त्यांना मी दाखवूनच देतो.

असा बोलून तो आपल्या घरातून जंगलामध्ये निघून गेला. तेथे जंगलात तो घोर तपश्चर्या करू लागला. त्यावेळी राक्षस सुद्धा तपश्चर्या करण्यामध्ये खूप माहीर होते. या भीम राक्षसाने तेथे जवळजवळ 1000 वर्षे घोर तपश्चर्या केली. त्यावेळी तो ब्रह्मदेवांच्या तपचर्येबरोबर आपल्या कुलदेवतेचे सुद्धा नामस्मरण करत असे. त्याच्या कठीण तपचर्येमुळे ब्रह्मदेवाला सुद्धा तेथे हजर व्हावे लागले.

ब्रह्मदेव भीम राक्षसावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला विचारले तुला कोणते वरदान हवे आहे ते तू माग . त्यावेळी भीम राक्षसाने मला या पृथ्वीतलावर कोणीच हरवू शकणार नाही अशी ताकत मागितली. देवानेही तथास्तु म्हटले. आता भीमराक्षसामध्ये महाभयंकर शक्तीने संचार केला होता. त्यावेळी शक्तिशाली भीम राक्षस आपल्या घरी मातेकडे आला आणि त्याने आपल्या आईला सर्व हकीगत सांगितली. त्यावेळी त्याला एवढा गर्व झाला होता की त्याने आपल्या आईला मी लगेच स्वर्गावर आक्रमण करतो असे म्हटले.

तसेच त्यावेळी त्याने खरोखरच स्वर्गावर आक्रमण केले आणि स्वर्गाचा राजा इंद्र देवांना त्याने हरवले. त्यावेळी इंद्रदेवांना मदतीला भगवान श्रीहरी श्री विष्णू आले. त्यावेळी भीम राक्षसाचे भगवान विष्णू बरोबर महाभयंकर युद्ध झाले. भीम राक्षसाला ब्रह्मदेवाचा वर असल्यामुळे त्याने त्यावेळी भगवान विष्णूंना सुद्धा हरवले. त्यामुळे सगळे भयभीत होऊन सैरावैरा पळू लागले. सर्वांना हरवून हा भीम राक्षस पृथ्वीवर परत आला. पृथ्वीवर आल्यानंतर सुद्धा साधू, संत व सर्व सामान्य सर्वांना तो त्रास देऊ लागला. सगळी रयत भयभीत

होऊन पृथ्वीवर देवांबरोबर सर्वांचेच अंधकारमय जीवन झाले होते. सर्व पृथ्वी तो ताब्यात घेऊ लागला होता. हे करत असताना सर्वप्रथम कामरूप देशाचा राजा सुदक्षणला हरवण्यासाठी भीम राक्षस निघाला. त्या ठिकाणी या राजाबरोबर त्याचे भयंकर युद्ध झाले. या दुष्ट भीम राक्षसाला ब्रह्मदेवाचे वरदान असल्यामुळे शिवभक्त सुदक्षण राजाला भीम राक्षसाने युद्धात हरवले आणि त्याच्या खजाण्यासह त्याचे सर्व राज्य ताब्यात घेतले. तसेच या सुदक्षन राजाला त्याने कैद केले. सुदक्षन राजाला कारागृहात ठेवलेले असताना राजा शिवभक्त असल्यामुळे त्याने एक पार्थिव शिवलिंग तयार करून कारागृहात शिवशंभो शंकरांचे नामस्मरण चालू केले.

राजाने शिवशंकरांचे इतके नामस्मरण केले की, रात्रंदिवस राजा “ओम नमः शिवाय “ चा जप करत होता. राजाच्या शिवभक्तीमुळे साक्षात गंगा तेथे आली होती. अशावेळी बाहेरील सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या राक्षसांनी भीम राक्षसाला जाऊन सांगितले की तुम्ही ज्या राजाला कैद केले आहेत तो राजा आत मध्ये सुद्धा एक शिवलिंग तयार करून त्याची कठोर भक्ती करत आहे. तुम्हाला मारण्यासाठी तो काहीतरी कटकारस्थान रचत आहे. हे सर्व ऐकून हा भीम राक्षस हातात नंगि तलवार घेऊन राजाकडे धावत गेला तर राजाचे

“ओम नमः शिवाय” चे नामस्मरण चालू होते. राजा त्याला घाबरत नाही हे पाहून तो फार क्रोधित झाला. तसेच भीम राक्षसाने रागात या शिवलिंगावरच तलवार चालवली. त्याचवेळी आपल्या भक्ताचे संरक्षण करण्यासाठी भगवान शिव शंकर तेथे प्रगट झाले.भगवान शिवशंकरांनी आपल्या त्रिशूलाने भीम राक्षसाच्या तलवारीचे दोन तुकडे केले. त्याच ठिकाणी तेथे महा भयंकर युद्ध सुरू झाले. या राक्षसाकडे ब्रह्मदेवाचे वरदान होते परंतु समोरून अखंड सृष्टीचे मालक भगवान शिव शंकर होते. तरीही हा भीम राक्षस काही मरत

नव्हता. त्यावेळी तेथे ब्रह्मपुत्र नारद त्या ठिकाणी आले आणि भगवान शिवशंकरांना त्यांनी प्रार्थना केली की देवा महादेवा या राक्षसाने अख्खी पृथ्वी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीवर हाहाकार माजला आहे.देवा तुम्ही याला सोडू नका. तुम्ही याच्याबरोबर काय युद्ध करताय याला कायमचे संपून टाकण्यासाठी आपल्या नजरेमध्येच तेवढी ताकद आहे.त्यावेळी भगवान शिव शंकरांनी त्याच्याकडे नुसत्या क्रोधित नजरेने पाहिले असता त्यांच्या महाभयंकर नजरेतून आग निघाली आणि त्याच महाभयंकर आगेत हा भीम राक्षस भस्मसात झाला. या राक्षसाला मारल्यानंतर सर्व देवी देवता त्या ठिकाणी आले आणि महादेवा वर फुलांचा वर्षाव झाला.

तसेच सर्व साधू संत,मुनी, ऋषी,ध्यानी सर्वांनी भगवान शिव शंकरांना त्याच ठिकाणी थांबून भक्तांचा उद्धार करण्यास विनंती केली. म्हणून ज्योतिर्लिंग स्वरूपात भगवान शिवशंकर तेव्हापासून तेथे विराजमान झाले. एवढेच नव्हे तर स्वतः महादेवांनी सांगितले आहे की, जो भक्त या ठिकाणी मनापासून या ज्योतिर्लिंगाची पूजा करेल त्याचे सर्व दुःख हरण होईल. म्हणून आजही कलयुगात तितक्याच श्रद्धेने भाविक या ठिकाणी जाऊन नतमस्तक होतात. या मंदिराची रचना नागरशैली वास्तुकला असून प्राचीन आणि काही नवीन

बांधकामामध्ये सुद्धा आहे. या मंदिराचा कळस अनेक प्रकारच्या दगडांपासून बनवलेला आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून 3250 फूट उंचीवर असून मंदिरात जाण्यासाठी जवळपास 240 पायऱ्या उतराव्या लागतात. येथे शिवलिंगाला हात लावून दर्शन घेण्याची संधी मिळते. येथे दुपारी बारा वाजता, दुपारी तीन वाजता आणि शेवटची आरती संध्याकाळी साडेसात वाजता होते. येथेच बाजूला गुरु गोरक्षनाथ यांचेही एक मंदिर आहे. भाविक तेथेही दर्शनाचा लाभ घेतात. भीमा नदीच्या उगम स्थानापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक रस्ता तयार केलेला आहे. या भीमा नदीला पंढरपूरला चंद्रभागा असे म्हणतात. तसेच ती पुढे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

येथे एक पंच गादी देवस्थान आहे. येथे ब्रह्म, विष्णू, महेश, सूर्य आणि चंद्र यांच्या देवस्थानाला पंच गादी देवस्थान असे म्हणतात. मंदिराच्या पाठीमागे एक ब्रिज आहे. त्याच्या बाजूने गेलेल्या रस्त्याने गुप्त भीमाशंकरला जाता येते. मुख्य मंदिरापासून गुप्त भीमाशंकर मंदिर अडीच किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्याने जाताना अनेक प्रकारच्या फुलांची झाडे दिसतात आणि अनेक प्रकारच्या पक्षांचे आवाज ऐकू येतात. गुप्त भीमाशंकर मंदिराकडे जाताना रस्त्याच्या कडेला एक छोटे गणेश मंदिर लागते.

असे सांगितले जाते की या गणेशाने भीम राक्षसाचा वध करताना भगवान शिव शंकरांना पाहिले होते. थोडक्यात हे गणेश भगवान त्या घटनेचे एक साक्षीदार आहेत. हे मंदिर येताच समजून जायचे की गुप्त भीमाशंकर मंदिर जवळच आले आहे. पायी चालत 25 ते 30 मिनिटात येथे भक्त पोहोचू शकतात. येथे एका धबधब्याखाली छोटे शिवलिंग तयार केलेले आहे. धबधब्याच्या पाण्यामुळे शिवलिंगाचा आपोआप जल अभिषेक होत असतो. परंतु उन्हाळ्यात हे पाणी काही प्रमाणात कमी होते. त्याचप्रमाणे भीमाशंकर मुख्य

मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर हनुमान लेग मंदिर आहे. येथे एक छोटेसे सुंदर हनुमान मंदिर असून तेथून जवळच नागफणी पॉईंट आहे. हा नागफणी पॉईंट भीमाशंकर मधील सर्वात उंच पॉईंट आहे.येथून भीमाशंकराच्या निसर्गाचे अतिशय सुंदर दर्शन घडते. तसेच कोकणकडा हा एक पॉईंट आहे तेथून कोकणचे नयनरम्य दृश्य पाहावयास मिळते भीमाशंकर च्या मंदिराजवळ अनेक प्रकारच्या सुक्या मेव्याची दुकाने, खव्याच्या पेढ्याची दुकाने,आयुर्वेदिक औषधांची दुकाने आणि इतरही छोट्या मोठ्या वस्तूंची दुकाने आहेत. त्याचप्रमाणे भीमाशंकर शहरात माफक दरात शाकाहारी जेवणाची आणि नाश्त्याची हॉटेल्स आहेत. भीमाशंकर बस स्टॅन्ड

मधून कुर्ला, मुंबई ठाणे, पुणे, सातारा अशा अनेक ठिकाणी जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध असतात. भीमाशंकर मध्ये भाविकांना राहण्यासाठी बस स्टँड च्या जवळ आणि मंदिराजवळ 600 रुपये पासून पंधराशे रुपये पर्यंतच्या हॉटेल रूम भाड्याने मिळतात. याच हॉटेलमध्ये सीझनच्या वेळेस अडीच हजार रुपये पासून सात हजार रुपयांपर्यंतचे रेट आकारले जातात. तसेच भीमाशंकर मध्ये राहण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एमटीडीसी भीमाशंकर रिसॉर्ट तयार करण्यात आलेले आहे. येथे राहण्यासाठी एसी,नॉन एसी,रिसॉर्ट रूम उपलब्ध असतात. जर आपली मोठी फॅमिली असेल तर रिसॉर्ट मध्ये पूर्ण रिसॉर्ट डॉरमेट्री आपण बुक करू शकता. हे गव्हर्मेंट एमटीडीसी भीमाशंकर पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या रिसॉर्टमध्ये रेस्टॉरंट सुद्धा आहे तेथे चहा, नाश्ता,जेवण इत्यादीची सुविधा असते. हे सुद्धा भक्तांना राहण्यासाठी चांगले ऑप्शन ठरू शकते.

Leave a Comment