तीर्थक्षेत्र शिर्डी | Tirth Kshetra Shirdi

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानापैकी एक असलेले शिर्डी हे तीर्थक्षेत्र ( Tirth Kshetra Shirdi ) श्री दत्तात्रयांचा अवतार मानले जाणारे सद्गुरु साईबाबा यांच्या वास्तव्याने पावन झालेले आहे. अहिल्यानगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील राहता तालुक्यात पूर्वी शिर्डी हे छोटे गाव होते. अहमदनगर पासून 87 किलोमीटर आणि कोपरगाव शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर असलेले हे शिर्डी गाव साईबाबा यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या समाधीस्थानामुळे देशाच्या नकाशावर ओळखले जाते.

तसेच हे गाव आता फार मोठे शहर झाले असून भारत देशाचे श्रद्धास्थान बनले आहे. शिर्डी या नावाचे मूळ हे शिर अडी या तामिळ शब्दापासून आल्याचे सांगितले जाते. शिर अडी या शब्दाचा अर्थ समृद्धी असा सांगितला जातो आणि खरोखरच या गावाच्या नावाप्रमाणेच येथे श्री साईबाबांच्या वास्तव्य आणि समाधीमुळे या शहरात सगळीकडे समृद्धी पाहावयास मिळते. प्रथम शिर्डी मध्ये साईबाबांना शिर्डीचे गृहस्थ चांदभाईच्या मेहुन्याच्या लग्नात पाहिल्यानंतर तेथील खंडोबा भक्त माळसापती आणि इतर अध्यात्मिक

लोकांना त्यांच्या दिव्य स्वरूपामध्ये ईश्वर अंश असल्याची जाणीव झाली. पुढे खरोखर तसेच घडले. या अवतारी पुरुषाने तेथील एका लिंबाच्या झाडाखाली आणि आजूबाजूच्या वनामध्ये कठोर तपश्चर्या करुन आणि अनेक चमत्कारी लीला करून येथील जनतेच्या अनेक प्रकारच्या व्याधी बऱ्या केल्या. तसेच सर्व धर्मीय लोकांना आपापल्या धर्म ग्रंथांचे ज्ञान सांगितले. बाबा शिर्डीत राहत असलेल्या त्यांच्या द्वारकामाई मशिदीमध्ये ते पेटवत असलेली धुनी आजही वर्षानुवर्षे पेटत आहे. तसेच पिडीतांच्या दुःख निवारणासाठी

वापरण्यात येणारी विभूती आजही द्वारकामाई या ठिकाणी जाऊन घेतात. बाबांची समाधी असलेल्या बुटी वाड्याच्या जागेवर भव्य दिव्य साई मंदिर उभारले असून शेजारी द्वारकामाई ही त्यांची पावन वास्तू आहे. साई मंदिराच्या परिसरात मारुती मंदिर आणि नवग्रहांची मंदिरे आहेत. साईबाबांच्या शिकवणी प्रमाणे “श्रद्धा” आणि “सबुरी” ठेवलेल्या भक्तांसाठी आजही पूर्वीप्रमाणेच भक्तांना अनुभव येतात. “सबका मालिक एक है “या त्यांच्या शिकवणीमुळे सर्व धर्मीय साई भक्त साई बाबांच्या समाधीवर लीन होतात.

रोज पहाटे चार वाजता साई मंदिराचे दरवाजे उघडले जातात. त्यानंतर काकड आरती आणि भूपाळी होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास समाधीला स्नान घालून बाबांची आरती केली जाते. तेव्हापासून ते रात्रीपर्यंत समाधी दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात. दुपारी अनेक भक्त ग्रंथ वाचन करतात. दिवस मावळतीला धुपारती होते. संध्याकाळी मंदिर परिसरात भजन, प्रवचन कार्यक्रम असतात. कीर्तनाच्याही नियोजित वेळा ठरलेल्या असतात. रात्री पावणेदहा वाजता द्वारकामाई मध्ये बाबांना जलार्पण केले जाते.

रात्री साडेदहा वाजता बाबांची शेजारती होते. आणि रात्री अकरा वाजता मंदिर बंद केले जाते. रोज साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी हजारो भक्त येथे येत असतात. तसेच गुरुवार, रविवार, वर्ष अखेर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तसेच गुरुपौर्णिमा, रामनवमी, बाबांची पुण्यतिथी आणि दत्त जयंती अशा उत्सवाच्या दिवशी लाखोंच्या संख्येने साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येतात.


साई मूर्ती विशेष

शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील बसवलेल्या मूर्तीला जवळपास 69 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. साई संस्थानामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साईबाबांच्या समाधी नंतर जवळजवळ 35 वर्षांनी सध्या असलेली साई मूर्ती बसवण्यात आली. त्याची कथा अशी सांगितली जाते की, सन 1952 मध्ये कोणालाच सांगता येणार नाही असा इटालियन शुभ्र दगड इटली वरून मुंबई डॉकयार्ड येथे पाठवण्यात आला होता. दगड उचलून घेण्यासाठी कोणीच नसल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी त्या दगडाचा लिलाव काढला होता. तसेच ज्या व्यक्तीने हा लीलाव उचलला त्यांनी हा दगड शिर्डीमध्ये साईबाबा संस्थान ला पाठवला.

फार किमती, मौल्यवान आणि सुंदर दगड पाहून शिर्डी संस्थान ने त्या दगडाची साई मूर्ती बनवायचे ठरवले. त्यानंतर मूर्ती बनवण्याचे काम मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार बाळाजी तालीम यांच्याकडे देण्यात आले. सुरुवातीला बाळाजींनी श्री साईबाबांची मातीची मूर्ती बनवली तसेच मूर्ती बनवण्यासाठी लागणारी हत्यारे लोहाराकडून स्पेशल बनून घेतली. साईबाबांच्या फोटो वरून आणि मातीच्या मॉडेल मूर्तीवरून तालीम यांनी साईबाबांची मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांना मूर्ती तयार करण्यामध्ये तरीही अडचणी येत होत्या. शेवटी तालीम यांनी साईबाबांना साक्षात दर्शन देण्याची प्रार्थना करून विनंती केली आणि आश्चर्य म्हणजे बाळाजी ज्या फोटो स्टुडिओ मध्ये गेले होते त्या फोटो स्टुडिओ मधील लख्ख प्रकाशात खरोखरच साईबाबांनी वेगवेगळ्या दिशेने त्यांना दर्शन दिले.

त्यानंतर तालीम यांनी बाबांनी दिलेल्या दर्शनाचा अंदाज लक्षात ठेवून बाबांची हुबेहूब मूर्ती तयार केली परंतु बाबांच्या दुमडलेल्या डाव्या पायाच्या खाली दगडाला एक पोकळी होती. तो भाग छणी हातोड्याने काढायचा होता परंतु मूर्ती तुटण्याची शक्यता वाटत होती. म्हणून बाळाजी यांनी काम थांबवले. तो भाग काढण्यास बाळाजीचे कारागीर तयार होईना तसेच बाळाजींनाही भीती वाटत असे. तेवढ्यात त्यांच्या अंतर्मनातून आवाज आला “काम सुरू ठेव.“ बाबांच्या आज्ञेमुळे स्वतः बाळाजींनी तो भाग छनि हातोड्याने काढला आणि मूर्ती सुखरूप पूर्णत्वास आली. आनंदाने बाळाजी नाचू लागला तसेच इतरांना पेढे भरू लागला. साईबाबांची ही मूर्ती अगदी सजीव असल्यासारखी वाटते. या मूर्तीची मिरवणूक काढून साईबाबांच्या समाधीस्थानावर तीची स्थापना करण्यात आली.

शेवटी 20 डिसेंबर 1993 ला बाळाजी यांचे निधन झाले. “जया अंगी जैसा भाव,तया तैसा अनुभव “ याप्रमाणे बाबांना कोणी राम मानतात तर कोणी कृष्ण, कोणी दत्तावतार मानतात तर कोणी फकीर. “सबका मालिक एक है “या बाबांच्या शिकवणी प्रमाणे सर्व धर्मियांचे शिर्डीचे साईबाबा हे एकमेव श्रद्धास्थान बनले आहे. त्याकाळी लोकमान्य टिळक आणि आधुनिक संत दासगणू महाराज यांनीसुद्धा बाबांचे दर्शन घेऊन सबका मालिक एक है हा संदेश जनतेला दिला होता. शिर्डी मध्ये साईबाबा संस्थांच्या वतीने गुरुपौर्णिमा, विजयादशमी आणि रामनवमी असे तीन मोठे उत्सव साजरे केले जातात. त्यातील राम नवमीच्या दिवशी रात्रंदिवस मंदिर

भक्तांना साई दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येते. सन 1897 मध्ये गोपाळराव गुंड नावाच्या इसमाला साई कृपेने पुत्रप्राप्ती झाल्यामुळे त्यांनी रामनवमी उत्सव दरवर्षी साजरा करण्याचे ठरवले होते. तात्या कोते आणि दादा कोते यांच्याकडे त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली होती. सर्वांना त्यांची ही उत्सव कल्पना आवडली होती परंतु त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून त्यांची परवानगी घेणे गरजेचे होते. परंतु गावातील कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्याकडे या उत्सवाला विरोध दर्शवत परवानगी नाकारली होती.

परंतु गाव घराणे त्या गोष्टीचा विचार करत होते. त्यांनी नेहमीच या मागणीचा पाठपुरावा केला. हिंदू मुस्लिम सणाचे ऐक्य साधत शेवटी रामनवमीच्या उत्सवाला परवानगी मिळाली आणि मोठ्या धुमधडाक्यात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येऊ लागला.
शिर्डीचे साईबाबा संस्थान भारत देशातील फार मोठे श्रीमंत संस्थान असून मंदिराच्या कळससह पूजेचे साहित्य, बाबांचा मुकुट, सिंहासन इत्यादी मंदिरातील वस्तू सोन्या चांदीच्या आणि हिरे जडीत आहेत. संपूर्ण आयुष्य फकीरा सारखे जगलेल्या साईबाबा मंदिराची उलाढाल कोट्यावधी रुपयांमध्ये चालते. अनेक शाळा,कॉलेज, दवाखाने, आश्रम इत्यादी समाजकार्य माफक दरात आणि मोफत चालवले जातात. संस्थानाच्या वतीने बँकेत ठेवण्यात आलेल्या ठेवींच्या फक्त व्याजावर ही मोठ मोठी कामे होतात.

तसेच येथे रोजच्या भरलेल्या दान पेट्या आणि मुबलक प्रमाणात येणारे सोने-चांदीचे दान अकल्पनीय आहे. शिर्डीला जाण्यासाठी सर्व महत्त्वाच्या शहरांपासून अनेक एसटी बसेस तसेच खाजगी वाहनांची सोय असून शिर्डी रेल्वे स्टेशन आणि शिर्डी विमानतळ या सुविधांचाही अनेक भक्त उपयोग करतात. प्रेम, श्रद्धा,सबुरी आणि निस्वार्थीपणाचा संदेश देणाऱ्या साईबाबांचे शिर्डी अनेकांचे आकर्षण केंद्र आहे. त्याबरोबरच शिर्डीतील मारुती मंदिर, पिकनिक स्पॉट साई हेरिटेज व्हिलेज, साई मंदिराजवळील साई तीर्थ,

मंदिरातील गुरुस्थान, मंदिराजवळील जुनी द्वारकामाई मशिद, द्वारकामाई व्यतिरिक्त साईबाबांनी वेळ घालवला ते ठिकाण म्हणजे चावडी, साईबाबांची एक प्रसन्न बाग म्हणजे लेंडी बाग, मंदिर परिसरातील एक आकर्षक संग्रहालय म्हणजे दीक्षित वाडा संग्रहालय, आणि शिर्डी पासून 72 किलोमीटर अंतरावर असलेले जागृत शनी देवस्थान म्हणजे शनिशिंगणापूर या ठिकाणी भेट दिल्याशिवाय शिर्डीला येणारे भक्तगण माघारी आपल्या गावी जात नाहीत.

Leave a Comment