श्री स्वामी समर्थ चरित्र | Shri Swami Samarth

भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून मान्यता असलेले श्री स्वामी समर्थ ( Shri Swami Samarth ) हे एकोणिसाव्या शतकातील सन 1856 ते 1878 या 22 वर्षांच्या कालखंडात अक्कलकोट निवासी होते. त्यांनी त्यांच्या अवतार कार्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यात भ्रमण केले होते. शेवटचा 22 वर्षाचा काल त्यांनी अक्कलकोट मध्ये घातला.आंध्र प्रदेश मधील श्रीशैल्यम जवळील कर्दळीवनातून स्वामी श्री नरसिंह सरस्वती यांचा पुढचा अवतार म्हणून आल्याचे सांगण्यात येते.

वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी स्वामी समर्थांना ओळखले जायचे. श्री स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी विविध लीला करून कृपा करत होते.त्यांनी त्यांच्या भक्तांना अनेक दुःखातून मुक्त केले होते .इस 1875 मध्ये वासुदेव बळवंत फडके हे जेव्हा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा त्यांना ही लढाई करण्याची वेळ नाही असे स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले होते. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिना विषयीची खरी हकीगत म्हणजे महाराज कधी आले कोठून आले कसे आले याबद्दल कोणालाच माहिती नाही परंतु त्यांचे अतिशय महान एक भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ महाराज आपला मुलगा मानायचे.

शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतामध्ये हस्तीनापुर पासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेली खेडा नावाचे गाव होते. तेथे विजयसिंह नावाचा मुलगा आपला भाऊ आणि भाऊजई सोबत राहत होता. तो मुलगा कोणाबरोबरही मिसळत नसायचा. तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या एका पडक्या जागेत मोठा वटवृक्ष होता. त्या ठिकाणी एक छोटीशी देवळी होती. त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तो विजय सिंह खिशात गोटया भरून तेथे जायचा आणि गणपती बरोबर खेळायचा. असाच एक दिवस तो तेथे गोटया खेळत असताना त्या परमात्म्याला आपला अविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली.

त्याने विजय सिंहला कारण बनवून आपला अविष्कार दाखवला. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. या दिवशी विजयसिंह रोजच्या पद्धतीने तेथे खेळत होता. त्याच्या मनात आले की रोज आपणच गोटया खेळतो एकदा तरी या गणपतीने माझ्यासोबत खेळायला हवे. त्याने गोटया गणपती समोर टाकल्या आणि म्हणाला बप्पा रोज मीच एकटा तुझा डाव खेळतो परंतु आज नाही आज तुझा डाव तूच खेळायचा. तेव्हा धरणी अक्षरशः कंपित होऊ लागली. वारे वेगाने वाहू लागले. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. कोणालाच काही कळेना हे काय होत आहे. परंतु त्यादिवशी ही अद्भुत शक्ती प्रकटणार होती. आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती.

ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरती दुभंगून एक आठ वर्षाचे बालक प्रगटले. आणि तेच बालक दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ होते. विजयसिंह गोटया खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोटया उधार दिल्या. तसेच त्याचवेळी स्वामी तेथून गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेली खेडा नावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरीभाऊ म्हणजेच स्वामी सूत स्वामीकडे अक्कलकोटला आले होते. आपल्या इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते काही दिवस तेथे मुक्कामाला होते. एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ घेतले आणि आपल्या मांडीवर बसवले.

तसेच त्यांना सांगितले की तू आज पासून माझा सूत झालास. तू सर्व घरदार सोडून दे.आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते येथे त्यांच्याशी इच्छापूर्तीसाठी आले होते. तेव्हा स्वामी म्हणाले रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे. त्यावर हात फिरून बघ. ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यावेळी त्यांना ध्यान लागले. तसेच त्यांना आपले सर्व जन्म आठवू लागले. त्यामध्ये त्यांना आपला एक जन्म आठवला तो म्हणजे विजयसिंह. विजयसिंह म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी सुतांचा दुसरा अवतार होता. त्यामुळे सर्व गोष्टींचा उलगडा झाला.

या सर्व गोष्टींना स्वतः स्वामींनी सांगितल्याप्रमाणे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत अक्कलकोट मध्ये साजरा करत होते. नाना रेखी यांनी सुद्धा स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटी येऊन स्वामींची कुंडली पत्रिका तयार केली होती. आजही स्वामींची ही कुंडली स्वामींच्या अहिल्यानगर मधील मठामध्ये आहे.स्वामीं महाराजांनी अक्कलकोट मध्ये अनेक चमत्कार केले. कोणाला दुर्धर आजारातून मुक्त केले तर कोणाचे मरण वाचविले. कोणाचे दारिद्र्यहरण केले तर कोणाला मुक्ती दिली.स्वामीं समर्थांना अनेक शिष्य होते आणि ते सुद्धा महान होते. त्यांच्या शिष्यांचीही मंदिरे आहेत. उदा. शंकर महाराज, देव मामलेदार, चोळाप्पा महाराज, स्वामींसूत, जंगली महाराज, इ. अशी बरीच नावे आहेत.

सर्वांचे लाडके आराध्य दैवत असलेल्या श्री स्वामी समर्थांचा लाखो लोक रोज जप करतात. संकट समई धावून येणाऱ्या आणि संकटातून बाहेर काढणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती आजवर अनेकांना आलेली आहे. असे हे स्वामी “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे “ आणि “ हम गया नही जिंदा है “ असे म्हणणाऱ्या स्वामींचा धावा करणाऱ्या सर्वांच्या मदतीला स्वामी महाराज धावून येतात. 30 एप्रिल 1878 मध्ये वार मंगळवार या दिवशी स्वामींनी आपला नश्वर देह ठेवला त्या दिवशी अक्कलकोट सह संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला. हजारो भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला.स्वामी मोठे अवलिया होते. वाटले तर ते आठ आठ दिवस आंघोळ करत नसत. किंवा एका दिवसात चार चार वेळा अंघोळ करायचे. त्यांच्या सर्व क्रीडा एखाद्या बालकाप्रमाणे असायच्या.

30 एप्रिल 1878 मंगळवार या दिवशी गेले पंधरा दिवस स्वामी काहीतरी विचित्र लक्षणे दाखवत होते. बारा दिवसांपासून त्यांनी अन्नही ग्रहण केले नव्हते. 30 एप्रिल च्या दुपारी काकूबाई व इतर भक्तांच्या विनंतीवरून स्वामींनी थोडी पेज घेतली होती. त्यावेळी बाळप्पाने त्यांना सुपारी दिली व हळूच झोपवण्यात आले. अक्कलकोट संस्थानाच्या राणीसाहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. स्वामींनी थोडी पेज घेतल्यामुळे राणी साहेबांना आनंद झाला होता. आता आपल्या महाराजांना भय नाही म्हणून त्या वाड्यात परतल्या. या दिवशी सर्व अक्कलकोट वाशीयांच्या हृदयाचा ठोका चुकला. स्वामींच्या सेवेची कल्पना असल्यामुळे स्वामींचे सेवेकरी बाळप्पा यांना वेगळी शंका होती म्हणून त्यांनी बाहेरील काही स्वामी भक्तांना तार केली होती. त्यावेळी मुंबईचे केशव नाईक आपल्या मुलाला घेऊन अक्कलकोट मध्ये आले होते. त्यांनी पाहिले की सर्व अक्कलकोट वाशीयांची हालचाल थांबली होती.

या देवभूमीचे वातावरण गंभीर जाणवत होते. सर्वांचे चेहरे पडलेले होते. चोळप्पांच्या मठातील भागीरथी नावाची गाय व तिचे वासरू दोन्ही सारखे हंबरत होते. स्वामी महाराज वडाखाली होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या सर्व जनावरांना आपल्यासमोर आणण्याचे सांगितले होते. हे ऐकताच स्वामींचे सर्व सेवेकरी अस्वस्थ झाले. तसेच त्या दिवशीचा सर्व नैवेद्य त्यांनी जनावरांना देण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर आपली सर्व वस्त्रे देखील त्या मुक्या जनावरांच्या अंगावर टाकण्यास सांगितले. जणूकाही त्या मुक्या प्राण्यांनाही या गोष्टीची कल्पना आली होती त्यांचेही डोळे पहाणावलेले होते.

स्वामींनी त्या मुक्या प्राण्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. त्यानंतर स्वामी पुन्हा पलंगावर येऊन बसले. स्वामींची ही विचित्र लिला पाहून सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. तसेच जमलेल्या हजारो भक्तांना आपले दुःख आवरता आले नाही. सर्व भक्त मनातल्या मनात आक्रोश करत होते. स्वामीच्या पलंगावर एक तास आधारासाठी भक्तांनी त्यांना लोड दिला. श्रीपाद भटजींनी त्यांना पलंगावर व्यवस्थित बसवले. याच अवस्थेत स्वामी मागे टेकले आणि लगेच त्यांनी आपले नेत्र मिटवून घेतले. जवळ असलेल्या वैद्यराज यांनी स्वामींची नाडी तपासून पाहिली. परंतु तो गडबडला आणि त्याच्या गडबडण्याकडे पाहून वडाच्या झाडाखाली एकच आक्रोश सुरू झाला. हजारो भाविकांना आपला हुंदका आवरता आला नाही. कोणी रडत होते तर कोणी आपली छाती बडवत होते.

कित्येक स्त्रीया आपल्या डोक्याचे केस उपटत होत्या. अनेक स्त्रिया गडाबडा लोळत होत्या. त्यांचा भुजंगा नावाचा सेवेकरी तर आपले डोके आपटून घेत होता. सर्व भक्तांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली होती. सगळीकडे दुःख आणि आक्रोश दिसत होता. स्वामी हालचाल करतील म्हणून सगळेजण त्यांच्याकडे टक लावून पहात होते. त्यांना आपल्या डोळ्यात साठवून घेत होते. स्वामींच्या लीला आठवून ते हमसून हमसून रडत होते.हजारो लोकांच्या अडचणी, संकटे, दुःख दूर करणारे स्वामी पलंगावर निपश्चित डोळे मिटून पहुडलेले पाहून सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटलेला होता. सारे अक्कलकोट दुःख सागरात बुडून गेले होते.

या आक्रोशात कोणी कोणाला सावरू शकत नव्हते. इतक्यात एक चमत्कार झाला. थरथरणाऱ्या अक्कलकोट नगरीस एक सुखद धक्का बसला. स्वामींनी आपले डोळे किलकिले करून सहज उघडले. आणि ते प्रेमाने सगळ्यांना न्याहाळू लागले. इतका वेळ सुरू असलेला आक्रोश एका क्षणात शांत झाला. जमलेले सर्व जण स्वामींच्या पलंगाकडे दोन पावले पुढे सरकले. त्यावेळी श्रीकृष्णांचे एक अद्भुत वचन श्री स्वामी मुखातून बाहेर पडले. “अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्”

स्वामींनी उच्चारलेल्या या मंत्राचा अर्थ आहे.अनन्य भक्तीभावाने जे माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्या जवळ जे आहे त्याचे मी रक्षण करतो. स्वामींच्या या वचनात सर्व भक्त भारावून गेले. स्वामींचे हे वचन कानात प्राण एकवटून सर्वजण ऐकत होते. भरल्या डोळ्यांनी स्वामींकडे पाहत होते. मग स्वामींनी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपले हात वर केले आणि पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. अंतसमयी स्वामींच्या मुखातून खसखस एवढे तीन दाणे बाहेर पडले. नंतर दरबार मंडळींच्या आग्रहामुळे स्वामींचा देह पेठेतील मठाच्या ध्यान गुहेमध्ये ठेवण्यात आला.

वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने स्वामींच्या समाधी लिलेत अंतिम स्वरूप देण्यात आले. सर्व भक्तगण आणि अक्कलकोट दुःख सागरात बुडाले. त्यानंतर बाळप्पा सलग तीन दिवस समाधीमध्ये उतरून स्वामींची पूजा करत होता. तीन दिवसानंतर समाधीला दगड लावून समाधी बंद करण्यात आली. आजही या समाधीस्थळी “हम गया नही जिंदा हैl” या वाक्याची अनेक भक्तांना प्रचिती येते. अशा या स्वामींना आणि त्यांच्या पुण्यभूमीला प्रणाम

Leave a Comment